शिर्डी येथे गावठी कट्टयातुन हवेत फायर करून दहशत निर्माण करणारे ३ आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून ३ गावठी कट्टयासह दोन लाख सत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हेशाखेने आपली मोहीम अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांकडे वळवली.
(संग्रहित दृश्य.)
जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती शनिवार (दि. ८) रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गणेश आप्पासाहेब शेजवळ, रा.भिमनगर, शिर्डी, ता.राहाता याचेकडे अग्नीशस्त्र असून त्याने दहशत निर्माण करण्याकरीता फायर केले असून, फायर केल्याचा व्हिडीओ त्याचे मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळाली. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार धाकराव, व पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, बाळासाहेब नागरगोजे, रोहित येमुल, प्रमोद जाधव, रमीजराजा आत्तार, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सारीका दरेकर व अरूण मोरे यांचे पथक तयार करून संशयीताची माहिती घेवुन पडताळणी करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. तपास पथकाने शनिवार (दि. ८) रोजी संशयितांचा शोध घेत असता आरोपी आरबीएल चौकाजवळ, शिर्डी ता.राहाता याठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश आप्पासाहेब शेजवळ, वय ३४, रा.भिमनगर, शिर्डी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. त्याला विश्वासात घेऊन अग्निशस्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने मोबाईलमध्ये अग्निशस्त्रचा व्हिडीओ दाखवला. व सदरचे अग्नीशस्त्र हे त्याचा चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ याचेकडे ठेवले असल्याची माहिती दिली. पथकाने पंचासमक्ष अजय रत्नाकर शेजवळ, रा.भिमनगर, शिर्डी, ता.राहाता याचे घरातुन एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा त्यात ३ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे व ३ रिकाम्या काडतुसाच्या पुंगळया जप्त केल्या आहेत. ताब्यातील आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ व अजय रत्नाकर शेजवळ यांचे कब्जातुन एक लाख वीस हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत.
(संग्रहित दृश्य.)
ताब्यातील आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ याचेकडे मिळून आलेल्या गावठी पिस्टल व काडतुसाबाबत विचारपूस केली असता त्याने भाऊसाहेब साहेबराव जगताप रा.शिर्डी, ता.राहाता, राकेश पगारे पुर्ण नांव पत्ता माहित नाही, रोशन सोमनाथ कोते रा.शिर्डी, ता.राहाता यांचेकडून प्रत्येकी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे खरेदी करून, त्यापैकी ३ काडतुसे हवेत फायर केले असल्याचे सांगीतले. पिस्टल विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेतला असता त्यातील रोशन सोमनाथ कोते, वय २४ , रा.शिर्डी, ता.राहाता हा मिळून आलेला असून उर्वरीत फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे. आरोपीविरूध्द शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. ११६/२०२४ आर्म ऍ़क्ट कायदा कलम ३/२५, ७, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.