INDIA VS PAKISATAN CHAMPIONS TROPHY 2025 : ‘मला वाटत पाकिस्तान जिंकला पाहिजे…’ अस विधान कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलेलं नसून एका माजी भारतीय क्रिकेटपटूने केले आहे. भारताच्या माजी क्रिकेटपटूने अचानक केलेल्या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.अतुल वासन हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत. ते म्हणाले की,रविवार (दि.२३) फेब्रुवारी रोजी होणारा हाय व्होल्टेज सामना भारताने नाही तर पाकिस्तानने जिंकावा अशी माझी इच्छा आहे. कदाचित त्यांचे हे विधान भारतीय संघाच्या चाहत्यांना सुईसारखे टोचू शकेल, पण त्यांनी त्यामागील कारण देखील सांगितले आहे.
(संग्रहित दृश्य.)
पाकिस्तानने जिंकावे….
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानला न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता जर पाकिस्तान संघ भारताकडून हरला तर स्पर्धेच्या गट टप्प्यातून त्यांचे बाहेर पडणे निश्चित आहे. अतुल वासन यांनी एएनआयला सांगितले की, मला हा सामना भारताने नाही तर पाकिस्तानने जिंकावा असे वाटते. कारण ते जिंकले तर स्पर्धेत रंगत पाहायला मिळेल. जर तुम्ही पाकिस्तानला जिंकू दिले नाही तर स्पर्धेतील ट्विस्टच पाहायला मिळणार नाही. जर पाकिस्तानचा संघ जिंकला तर मजा येईल. बरोबरीची लढाई व्हायला हवी. यादरम्यान, अतुल वासन यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाचे विश्लेषण करताना, प्लेइंग इलेव्हनमधील फलंदाजीची खोली देखील अधोरेखित केली. यासोबतच, त्यांनी दुबईमध्ये फिरकी आक्रमणासोबत जाण्याच्या रणनीतीचेही समर्थन केले. ते म्हणाले की, भारताकडे खूप चांगले फलंदाज आहेत, शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली,अक्षर पटेल आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करतो. तुम्ही ५ फिरकीपटू निवडले आहेत आणि हा संघ दुबईसाठी सर्वोत्तम आहे. अतुल वासन यांनी १९९० ते १९९१ दरम्यान भारतासाठी ४ कसोटी आणि ९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. अतुल वासन म्हणाले, जोपर्यंत पाकिस्तान आपले क्रिकेट सुधारत नाही तोपर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यात उत्साह नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण १३५ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्ध ५७ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, पाकिस्तान संघाने ७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला पराभूत केले आहे. याशिवाय ५ सामने अनिर्णीत राहिले आहेत.