अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटीत पती आणि उद्योजक संजय कपूर यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं आहे. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी जाऊन मधमाशीनं चावा घेतला. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती समोर आली आहे. अशातच सध्या संजय कपूर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण, पुढे काही तासांतच त्यांचं निधन झालं. २००३ मध्ये संजय कपूरनं करिश्मा कपूरशी लग्न केलं. दरम्यान, हे लग्न फक्त १३ वर्ष टिकलं. २०१६ मध्ये, घरगुती हिंसाचाराच्या आरोपांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. दोघांनाही दोन मुलं आहेत, एक मुलगी समायरा आणि मुलगा कियान. दोघांचीही कस्टडी आता करिश्मा कपूरकडे आहे. घटस्फोटानंतर संजय कपूरनं प्रिया सचदेवशी लग्न केलं आणि दोघांनाही एक मुलगा आहे. सध्या तो मुलगा सात वर्षांचा आहे.
(संग्रहित दृश्य.)
संजय कपूर यांनी लिहिलं की….
संजय कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना संजय कपूर यांनी लिहिलं की, अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी अत्यंत दुःखद आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. देव त्यांना कठीण काळात शक्ती देवो.दरम्यान, १२ जून रोजी दुपारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान उड्डाणानंतर अवघ्या ५ मिनिटांनी कोसळलं. हे विमान निवासी भागात कोसळलं. विमानात बसलेल्या एका प्रवाशाशिवाय सर्वांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित होते. विमान अपघातात त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.