घोडबंदरच्या कासारवडवली परिसरात निर्मनुष्य ठिकाणी खाडीकिनारी सुरू असलेल्या या पार्टीमध्ये शंभर तरुण-तरुणी सहभागी झाले होते. दोन तरुण आयोजकांनी या पार्टीचे आयोजन केले होते.नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव पार्टीवर गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी चरस, एलएसडी, एस्कैंटसी पिल्स, गांजा अशा अंमली पदार्थांसह २९ दुचाकी, मद्यसाठा असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र ठाण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेव पार्टीमुळे या अंमली पदार्थांच्या रॅकेटबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याठिकाणी ९० पुरूष व ५ महिला या अंमली पदार्थाचे सेवन करून मदयधुंद अवस्थेत डिजेच्या गाण्यावर नृत्य करीत असताना आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या इव्हेंटचे आयोजन करणा-या दोन तरुणांना ताब्यात घेवुन त्या दोघांकडून चरस ७० ग्रॅम, एलएसडी ०.४१ ग्रॅम, एस्कैंटसी पिल्स २.१० ग्रॅम, गांजा २०० ग्रॅम, बिअर,वाईन, व्हिस्की असा दारू व अमली पदार्थांचा आठ लाख तीन हजार ५६० रुपये किंमतीचा साठा पोलिसांनी हस्तगत केला.२९ मोटार सायकली घटनास्थळी पोलिसांना आढळून आल्या आहेत.या रेव पार्टीचे आयोजन केल्यानंतर तरुणाईला सोशल मीडियावरून घटनास्थळाचा पत्ता पाठवण्यात आला होता. ठाणे, नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली, मीरारोड अशा भागातून तरुण-तरुणी या ठिकाणी स्वतःच्या वाहनाने आले होते. घटनास्थळी २९ मोटारसायकली आणि गांजा पिण्याचे साहित्य आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुढील कारवाई वैद्यकीय अहवालानंतर.
पार्टीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी एनडीपीएस अॅक्ट, महाराष्ट्र दारूबंदी कायदयाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात रेव पार्टी होत असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली असून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांचेकडे कोणतेही अंमली पदार्थ विकी, सेवन अथवा रेव पार्टीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.