राज्यात गेल्या महिन्याभरापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २०नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगला आहे. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहे. तिसरीकडे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीदेखील निवडणुकीला सामोरे गेली आहे. आता राज्यभराचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. त्यातच आता महाविकास आघाडीकडून फाटाफूट टाळण्यासाठी मोठा डाव टाकण्यात आला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोणाची सरशी होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून विशेष काळजी घेतली आहे. उमेदवार निवडून आल्यानंतर आपण पक्षासोबत राहू, असं प्रतिज्ञापत्र पक्षातील सर्व उमेदवारांकडून घेण्यात आले असून पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता, आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच काळजी घेतली जात आहे. नाशिकच्या ओझर येथे खासगी विमानं तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीच्या या खेळीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल, जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात कुणी मारली बाजी? कोण होणार तुमचा आमदार? कुणाची येणार सत्ता?