मुंबई : हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत पण ते करत असताना दुसऱ्याच्या धर्मावर आम्ही अन्याय करणार नाही. तशी आमची शिकवण नाही असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्ष नेते अनिल परब म्हणाले. विधान परिषदेत बोलताना त्यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात एक नेपाळी आहे. त्याला वाटतंय की मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे. जाती-जातीत आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात केला जात आहे.असा आरोपही त्यांनी केला. विधान परिषदेत अनिल परब बोलताना त्यांच्या शेजारी शिवसेनेचे पक्ष प्रमुख नेते उद्धव ठाकरे उपस्थित होते. अनिल परब म्हणाले की, हल्ली काय झालं आहे की मांसाहार खायचं नाही असं कोणीतरी म्हणतं, त्यांना हा अधिकार कुणी दिला ? मटण कोणतं खायचं झटका मटण खायचं की हलाल खायचं हे तुम्ही सांगणार का? एक मंत्री सांगतो आपण काय खायचं आणि काय खायचं नाही. राज्यात हिंदू मुस्लिम वाद होतील असं वातावरण आहे. माझ्या सोसायटीत नेपाळी वॉचमन आहे तो रात्रभर ओरडत असतो जागत राहतो. त्याला वाटत त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहे, पण तसं नाही. सध्या असंच एक नेपाळी अंगावर शाल घेऊन फिरतोय आणि मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं सांगत आहे. पण हिंदू धर्म वाचवायला आम्ही समर्थ आहोत. आपल्याला जगायचं कसं, बोलायचं काय ,राहायचे कसं यावर घटना भाष्य करते. मला बोलण्याच स्वातंत्र्य मिळाल आहे. पण हे स्वातंत्र्य मिळालं म्हणून मी काहीही बोलू शकत नाही. सध्या असं होतं नाही. आता कोणीही उठतंय, देवाची विटंबना कर, महापुरुषांची विटंबना कर असा प्रकार सुरू आहे असं अनिल परब म्हणाले.