जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये संतापजनक घटना घडली आहे. मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग धगधगत असल्याने बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावरती गोळ्या झाडून त्या दोघांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वत:च्या मुलीवरती आरपीएफच्या निवृत्त जवानाने एका लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी झाडून तिचा खून केला. या गोळीबारात जावई देखील गंभीर जखमी झाला आहे. तर घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासराही जखमी झाला आहे. ही संतापजनक घटना चोपडा शहरातील डॉ.आंबेडकर नगर परिसरात काल (शनिवारी दि.२६) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संतप्त लोकांनी गोळी झाडणाऱ्या वडिलांना मारहाण केली. यात तोही गंभीर जखमी झाला आहे. तृप्ती अविनाश वाघ (वय २४ ) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ (वय २८, दोधे रा.करवंद, शिरपूर, सध्या वास्तव्यास असलेले कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. आरोपी वडील किरण अर्जुन मंगले (वय ४८, रा.शिरपूर) याला हा विवाह पसंत नव्हता. बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते.
(संग्रहित दृश्य.)
लेक आणि जावयाची गोळी झाडून हत्या…
बहिणीच्या हळदीसाठी लेक आणि जावई त्या ठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली. अविनाश याच्या बहिणीची हळद काल (शनिवारी दि.२६) एप्रिल चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकरनगर येथे होती. त्या निमित्ताने ते चोपडा येथे आले होते. त्यात तृप्तीने प्रेम विवाह केल्याचा राग वडील निवृत्त सीआरपीएफ किरण अर्जुन मंगले यांच्या मनात धगधगत होता. हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून त्यानी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. यात मुलगी तृप्ती ठार झाली. तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वडील आणि मुलगी समोरासमोर आले. तृप्तीला पाहताच तिच्या वडिलाने रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला पण त्यालाही गोळी लागून तो गंभीर जखमी झाला.अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जाळगावला उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या वडिलाला मारहाण केली. दरम्यान शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.