भाईंदर : मिरा- भाईंदर वसई- विरार पोलीस आयुक्तालयातील नयानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रामनाथ ठमाजी तांदळकर (वय ५६ ) यांनी आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी शुक्रवारी (दि.२५ ) एप्रिल रात्री रामनाथ तांदळकर यांना ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराच्या भावा विरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यात आरोपीला (दि.१९) एप्रिल २०२५ रोजी अटक केली आहे. तक्रारदार यांच्याकडे लोकसेवक रामनाथ तांदळकर पोलीस उपनिरीक्षक यांनी आरोपीची जामिनावर सुटका करण्यासाठी व चांगला तपास अधिकारी न्यायालयात देण्यासाठी ७० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांनी (दि.२३) एप्रिल रोजी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक तांदळकर यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तांदळकर यांनी तक्रारदार यांच्याकडून मागणी केलेल्या लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष ५० हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून घेतली आहे. लोकसेवक तांदळकर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तांदळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांचे पोलीस निरीक्षक विजय कावळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनकर नलावडे, पोलीस हवालदार योगेंद्र परदेशी, अनिल उगले, गणपते, पोलीस शिपाई चालक अहीरे यांनी केली आहे.