राज्याच्या उपराजधानी नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या करण्यात आली आहे. डॉ. अर्चना राहुले असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती डॉ. अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार डॉ.अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. तर आरोपी पती डॉ. अनिल (वय ५२ वर्ष) हा छत्तीसगड ते रायपूर येथे वैद्याकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे. घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला असल्याची माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृतकला एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतोय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. नागपूर जिल्ह्यात उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीतील भीषण स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर सात जण जखमी झाल्या प्रकरणी कंपनीतील ३ अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात जनरल मॅनेजर टी. एन. मूर्ती सेफ्टी ऑफिसर रमेश भाजीपाले शिफ्ट मॅनेजर अमित बचाले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची नाव असून अद्याप पर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालात व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी ३ अधिकाऱ्यांना नेमकी कधी अटक होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.