नेरुळ सिवूड्समधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये एका शालेय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शाळेच्याच बस चालकाने विद्यार्थ्यावर अत्याचार केला असल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत होता. या घटनेचा निषेध म्हणून पालकांकडून शाळेसमोर मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एनआरआय पोलिसांनी बस चालकाला एका तसातच ताब्यात घेतले असून बसमधील सिसिटीव्ही तसेच फॉरेन्सिकच्या आधारावर तपास सुरु आहे. न्यायालयाने आरोपीला (दि.३०) एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. नेरुळ सिवूड्स मधील दिल्ली पब्लिक स्कूल मधील शाळेच्याच बस चालकाने एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या पृष्ठ भागावर पेन्सिल टोचल्याची घटना घडली होती. ४ वर्षीय चिमुकला नेहमी प्रमाणे शाळेतून घरी परतला. त्याचा डोळ्यात पाणी असल्याने आईने त्याला विचारल्यावर त्याने जे काही सांगितलं त्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित चिमुकल्याने सांगितलं की त्याचा प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत आहेत. पालकांनी विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले. त्यानंतर पालकांनी शाळेत धाव घेऊन शाळा प्रशासनाला धारेवर धरले. मात्र शाळा प्रशासनाकडून त्या बस चालकावर कोणतीही कारवाई न केल्याने पालकांचा राग अनावर झाला. त्यामुळे पालकांनी एनआरआय पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी एका संशयितला ताब्यात घेतले असून ज्या बसमध्ये हा प्रकार घडला ती बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्या बस मधील सिसिटीव्ही फुटेजची तपासणी तसेच बसची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी सुरु आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने आरोपीला दि.३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून याबाबत पुढील तपास एनआरआय पोलीस करत आहेत. शाळा प्रशासनाचा आडमुठेपणा याआधी देखील पालकांनी सहन केला आहे. त्यामुळे या घटनेनंतर पालक त्रस्त झाल्याने पालकांनी शांततेत आक्रोश मोर्चा काढला. पालकांच्या या लढ्याला मनसे तसेच शिवसेना उबाठा गट या पक्षांनी देखील पाठिंबा दिला असून, शाळा प्रशासनाच्या विरोधात दोनही पक्षातील पदाधिकारी हाताला काळ्या फीत बांधून पालकांच्या या आक्रोश मोर्च्यात सहभागी झालेले पहायला मिळाले. तसेच शाळेच्या मुख्यध्यापकांना देखील यात सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.