उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे एका २१ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकरणातील मुख्य आरोपीने दोन मारेकर्यांना सुपारी देण्यासाठी तसेच या गुन्ह्यासंबंधी खर्चासाठी बँकेकडून ४० हजार रुरयांचे कर्ज घेतल्याचे उजेडात आले आहे. आशिष असे आरोपीचे नाव असून तो पीडित महिलेवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा परिसरातील बवना गावात ही घटना घडली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि दीपक यांच्याबरोबर मिळून आशिष महिलेला तिच्या घरातून घेऊन गेला, त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. इतकेच नाही तर गुन्ह्यासंबंधी पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात त्यांनी तिचा मृतदेहही जाळला. दरम्यान आशिष याला अटक करण्यात आली आहे तर त्याचे दोन साथिदार मात्र फरार आहेत. आशिषने आपला गु्न्हा कबुल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
(संग्रहित दृश्य.)
१० हजार अॉडव्हान्स तर गुन्हा केल्यानंतर २० हजार देण्याचे कबुल….
मुजफ्फरनगरचे पोलीस अधीक्षक (एसपी ग्रामीण) आदित्य बंसल यांनी सागितले की महिलेला अखेरचे २१ जानेवारी रोजी तिच्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर स्कूटरवर जाताना पहिले गेले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिले आहे. मुख्य आरोपीचे तिच्याशी दोन वर्षांपासून अवैध संबंध होते. त्याने पोलिसांना सांगितलं की, ती महिला त्याला दोघांचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओ वापरून ब्लॅकमेल करत होती. उघडे पडण्याच्या भीतीने, त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत कट रचला होता. त्याने बँकेतून ४० हजारांचे कर्ज घेतले, त्याने साथीदारांना १० हजार रूपये अॉडव्हान्स म्हणून दिले आणि गुन्हा केल्यानंतर २० हजार देण्याचे कबुल केले होते, असे आदित्य बन्सल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, आरोपींनी आधी महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिच्या स्कार्फने तिचा गळा आवळला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळला. इतर कपडे जळालेले तर अंतरवस्त्रे शाबूत राहिल्याचे आढळून आल्याने लैंगिक अत्याचाराचा संशय आला. दोन कंडोमची पाकिटेही सापडली होती असेही त्यांनी माहिती देताना सांगितले.