इंस्टाग्रामवर मेसेज पाठवत बहिणीला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून बहीण भावासह पाच जणांनी एका तरुणाला पुण्यातून उचलून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात आणत जबर मारहाण केली. तसेच त्याला विष पाजून त्याची हत्या केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. ही घटना ( दि.१०) मे रोजी सकाळ ते दुपारच्या दरम्यान घडली असून साईनाथ गोरक्षनाथ काकड (वय २४ रा. डोर्हाळे ता. राहाता) असे मृत युवकाचे नाव आहे. साईनाथ काकड याच्या घरी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणाला जखमी अवस्थेत शिर्डीच्या सुपर हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर जमाव आक्रमक झाल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मयत साईनाथचा भाऊ महेश काकड याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साईनाथ व रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात. ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहण्यासाठी होते. साईनाथने रुपाली हिच्या बहिणीला इस्टाग्रामवरुन मेसेज करुन शिवीगाळ केली. त्यामुळे यातील रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने, पवन कैलास आसने, राहुल अशोक चांदर हे साईनाथ राहत असलेले ठिकाणी पुणे येथे गेले व त्याला घरातून ओढत आणून गाडीमध्ये टाकून कोकमठाण येथे घेऊन गेले. कोकमठाण येथे साईनाथला मारहाण केली आणि त्याला काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे करत आहेत.