महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी ३० वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत काढताना भरभरून मतदान केलं आहे. २०२४ च्या सर्वात लक्षवेधी आणि राजकारणाची खिचडी झाली असताना ६५.१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांचे मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मतदानाचा उच्चांक कोल्हापूर जिल्ह्यात झाला असून ७६ टक्के मतदान झालं आहे. राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात ८४.७९ टक्के मतदान झालं आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बंपर मतदानामुळे राज्यातील १०० विधानसभा जागांवर निकराची लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनीही उत्साहाने मतदान केले होते. याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता. त्यामुळे तब्बल ३० वर्षांनी राज्यात मतदानाचा आकडा वाढला आहे. यापूर्वी १९९५ मध्ये राज्यात विक्रमी ७१.६९ टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर-काँग्रेस, शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले होते. मात्र, महाराष्ट्रात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय २३ नोव्हेंबरला होणार आहे.
(संग्रहित दृश्य.)
मतदानाचा टक्का वाढला की सत्ता…
विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमक प्रचार केल्याचे जाणकारांचे मत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८.८५ कोटी मतदार होते, जे आता ९.५ टक्क्यांनी वाढून ९.६९ कोटी झाले आहेत. मतदानाचा टक्का वाढला की सत्ता बदलते, असा निवडणुकीचा कल राहिला आहे. मतांची टक्केवारी वाढल्यानंतर सत्ता बदलली आणि अनेक वेळा सत्ताधारी आघाडीलाही फायदा झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढले आणि महाविकास आघाडीने बाजी मारली होती. लोकसभा निवडणुकीत राज्यात ६१.३९ टक्के मतदान झाले होते. महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के, तर महायुतीला ४२.७१ टक्के मते मिळाली होती. २०१४ मध्ये ६३.६८ टक्के मतदानानंतर भाजप १२५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवत ६३ जागा जिंकता आल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले होते. महाराष्ट्राच्या गेल्या ३० वर्षांच्या निवडणूक इतिहासात असे प्रसंग आले आहे, की कमी मतदान होऊनही सरकार निवडून आले. मतदानाची टक्केवारी घसरली असतानाही २००९ मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेत आली होती. २००९ मध्ये ५९.६८ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी घसरल्याचा फायदा सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसला झाला होता. विरोधात बसलेल्या शिवसेना आणि भाजपला एकूण ११० जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी मनसेने १३ जागा जिंकून महायुतीला धक्का दिला होता. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झालं.