बीड : एकीकडे सासरच्यांच्या छळाला कंटाळून सूना आत्महत्या करण्याच्या बातम्या सातत्याने कानावर पडत असताना बीडमध्ये मात्र या उलट प्रकार घडला आहे. पती पत्नीचा वाद विकोपाला गेला आणि नंतर पत्नीने माहेरच्या मंडळींना बोलावून पतीला बेदम मारहाण केली. त्यामध्ये पतीचे दोन्ही पाय आणि हात मोडले. रामहरी मोरे असं पतीचं नाव असून अनुसया काकडे असं पत्नीचं नाव आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस स्थानकात पत्नीसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. पत्नीने माहेरच्या मंडळींना बोलावून पतीचे अपहरण केले आणि त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचे दोन्ही पाय आणि एक हात फ्रॅक्चर झाला आहे.
(संग्रहित दृश्य.)
दोन्ही पाय आणि उजवा हात मोडला…..
रामहरी मोरे याचा विवाह मागील वर्षी अनुसया काकडे हिच्यासोबत झाला होता. परंतु घरगुती कारणावरून दोघांचे सातत्याने भांडण होत होते. त्यामुळे हे पती-पत्नी विभक्त राहत होते. अशातच रामहरी मोरे आपले सामान घेण्यासाठी पत्नीच्या घरी गेला असता या दोघांचे पुन्हा भांडण झाले.भांडणाचा वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच रामहरी मोरे यांनी घरातून काढता पाय घेतला आणि ते आपल्या गावी निघाले. मात्र त्याच वेळी पत्नीने तिच्या माहेरच्यांना बोलावून घेतलं. तिच्या माहेरच्या मंडळींनी रामहरी मोरेचे रस्त्यावरुन अपहरण केलं आणि त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत रामहरी मोरे याचे दोन्ही पाय आणि उजवा हात मोडला. या मारहाणीत रामहरी मोरे हा जबर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.