नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्कारावा लागला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभेची निवडणूक लढवली होती, पण केवळ १६ जागांवर विजय मिळवण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यातच नाना पटोले यांनीही आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार नाना पटोले यांनी मंगळवारी दिल्लीवारीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात कॉंग्रेस पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते. आता महाराष्ट्रात काँग्रेसची कमान कोणाकडे जाणार ? काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता लागली असून राज्यातून ४ नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील एक तर विदर्भातील एक नाव पुढे येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील देखील दोन नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र काँग्रेसचे निष्ठावान आणि आदिवासी नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(संग्रहित दृश्य.)
प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच…..
दिल्ली दौऱ्यानंतर नाना पटोले यांनी पुढील आठवड्यातच काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते. काँग्रेसला राज्यात आता नवा कॅप्टन मिळणार असून याच आठवड्यात नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी या संदर्भात बोलणं झालं असून प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा याच आठवड्यात सुटेल असे नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. त्यानुसार आता दिल्लीत महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्यामध्ये कोल्हापुरातील नेते व माजी मंत्री सतेज बंटी पाटील,माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर माजी मंत्री व युथ काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या आमदार विश्वजीत कदम यांचेही नाव आघाडीवर आहे. मात्र या तीन नावांसह सरप्राईजींग नाव म्हणजे बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्यातील काँग्रेसची धुरा देऊन आदिवासी समाजाला नेतृत्व देण्याचा प्रयत्नही काँग्रेसच्या विचाराधीन आहे. नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी कोल्हापुरात सतेज पाटील तर लातुरातून अमित देशमुख यांच्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. तसेच विश्वजीत कदम यांचेही नाव समोर येत आहे.
(संग्रहित दृश्य)
आदिवासी चेहऱ्याला राज्याचे नेतृत्व….
हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांचही नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी बुलढाण्यातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि गांधी घराण्याशी जवळीक असल्याने तेही रेसमध्ये आहेत. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमात ते नेहमीच सक्रिय सहभागी राहिले आहेत. सन २०१४ ते २०१९ या काळात बुलढाणा विधानसभेच प्रतिनिधित्व त्यांनी केल होत. सध्या राजीव गांधी पंचायत राज संघटनचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी जिवनोत्थान कार्यक्रम सक्रियतेने राबवून आदिवासी बांधवांमध्ये गळ्यातील ताईत म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे एका आदिवासी चेहऱ्याला राज्याचे नेतृत्व देऊन काँग्रेसकडून राजकीय डाव टाकला जाऊ शकतो.