TIMES OF NAGAR
दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची ऐनवेळी गैरसोय होवू नये, यासाठी तंत्रशिक्षण (डीटीई) विभागाने महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन केले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. अशा इशारा डीटीई कडून देण्यात आला आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या प्रक्रियेला चाप बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र यांसारखे आवश्यक असणार कागदपत्रे विद्यार्थ्यांना काढावी लागणार आहे. डिप्लोमा इन इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) ही प्रवेश प्रक्रिया येत्या आठवड्याच सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास अनेक विद्यार्थी प्राधान्य देत असल्याने, महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन केले आहे. संचालनालयाने ‘डीटीई’ मार्फत दर वर्षी केंद्रीभूत ऑनलाइन प्रक्रियेच्या (कॅप) माध्यमातून प्रवेश दिले जातात. यासाठी ‘डीटीई’ मार्फत वेळापत्रक जाहीर केले जाते. सध्या ‘डीटीई’ मार्फत प्रवेश प्रक्रियेची तयारी म्हणून काही सूचना जाहीर करण्यात आल्या असून, पॉलिटेक्निक प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांसाठी https://www.dte.maharashtra. gov.in या वेबसाइटवर प्रमाणपत्रांची तपशीलवार माहिती जाहीर करण्यात आली आहे.