TIMES OF NAGAR
काहीच दिवसांपूर्वी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला त्यानंतर आता इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अकरावी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला येत्या सोमवार (दि.१९) पासून सुरुवात होणार आहे. ऑनलाईन पोर्टलवर सध्या महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या प्रवेशासाठी शुक्रवार (दि.१५) मे पासून सुरुवात झाली असून डिप्लोमाच्या विविध जागांसाठी प्रवेशप्रक्रियेची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. महानगरांमध्ये अकरावीची ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात होती. आता शिक्षण संचालनालयाने संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया ऑनलाइन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा संपूर्ण राज्यभरात ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सोमवार पासून सुरुवात होणार आहे. दि. १९ ते २८ मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल. अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाइटचा वापर करावा लागेल. विद्यार्थ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी इतर बनावट वेबसाइटपासून दूर राहण्याची गरज आहे. अर्ज भरण्यासाठी नोंदणी शुल्क केवळ १०० रुपये लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरी, चार सामान्य फेऱ्या व विशेष फेरी अशा फेऱ्या राहणार आहेत. त्याचे सविस्तर वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.