राहुल गांधी यांनी सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याचा सल्ला दिला होता. असा दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केला आहे. एबीपी माझा कट्ट्यावर राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेस सोडण्यामागचा विचार काय होता? असे विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, १९९१ च्या पराभवानंतर आमच्या सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस गेले होते. त्यावेळी शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. १९९५ च्या निवडणुकीत शरद पवार मुख्यमंत्री होते. तेव्हा मी काँग्रेस पक्षाचा आमदार झालो. परंतु १९९१ सालच्या दरम्यान आम्हाला झालेल्या कोर्टाच्या त्रासाने मला मानसिक त्रास होत होता. त्यावेळी मी ठरवलं एकदा पक्षातून बाहेर निघून समोरासमोरच जाहीर भूमिका घेऊ. तेव्हा शंकरराव चव्हाण यांना भेटलो. त्यांना मी सांगितले, मी पक्षात अस्वस्थ आहे. त्यांनी मला सांगितलं, तू विचारपूर्वक निर्णय घे. त्यानंतर मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. मी बाळासाहेबांना भेटलो. त्यांनी मला मानसन्मान दिला होता. सुजयच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही म्हणत होतो, जागा आदलाबदल करा, औरंगाबादची जागा सलग बारा वेळेस काँग्रेस हरली आहे. नगर दक्षिणची जागा सलग तीन वेळेस राष्ट्रवादी हरली आहे. मी याबाबत पवार साहेबांना दोन चार वेळेस भेटलो. ते म्हणाले माझा कार्यकर्ता ऐकत नाही. पवार साहेब असं सांगताय त्यांचे कार्यकर्ते ऐकत नाही? यावर तुम्हाला तरी विश्वास बसेल का? त्यानंतर मी राहुल गांधींना भेटलो. त्यांनी मला सांगितले सुजय विखेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढायला सांगा. मी म्हटलं ऑल इंडियाचे अध्यक्ष जर मला असं सांगत असतील त्यापेक्षा मी भाजपमध्ये गेलेले कधीही चांगलं, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. त्यानंतर खरगे साहेब आले ते मला बोलले एवढं मनावर घेऊ नका, पाच वर्षानंतर आपण पाहू. मी सुजयला फोन केला, तू निर्णय कर, देवेंद्रजींना फोन कर आणि आम्ही भाजपमध्ये दाखल झालो. असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.