पोर्श अपघात प्रकरणात आणखी दोघांना अटक , मंगळवारी कोर्टात सुनावणी.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | PORSCHE CAR ACCIDENT | VISHAL AGARWAL |PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल यांना रक्ताचे नमुने बदल करण्यासाठी त्यांनी मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघांच्या माध्यमातून अगरवाल ससूनमधील डाॅ. अजय तावरेच्या संपर्कात आल्याचे तपासात उघड झाले आहे. आदित्य अविनाश सूद (वय ५२), आशिष सतीश मित्तल (वय ३६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
(संग्रहित दृश्य.)
जामीन अर्जावर न्यायालय मंगळवारी (२० ऑगस्ट) निर्णय देणार
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदल प्रकरणात यापूर्वी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आई शिवानी आणि ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय मंगळवारी (२० ऑगस्ट) निर्णय देणार आहेत.
(संग्रहित दृश्य.)
संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.
कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात झाला होता. भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल याने ससूनमधील डाॅ. तावरेशी संपर्क साधला. त्यासाठी मकानदार, गायकवाड यांच्या माध्यमातून चार लाखांची रक्कम देण्यात आली होती. अगरवालचे परिचित आदित्य सूद, आशिष मित्तल यांची डाॅ. तावरेशी ओळख होती. त्यांच्या माध्यमातून अगरवालने डाॅ. तावरेशी संपर्क साधल्याचे तपासात उघड झाले होते. गुन्हे शाखेकडून सोमवारी रात्री उशीरा सूद आणि मित्तल यांना अटक करण्यात आली होती. दोघांना अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैेलैश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे आणि पथकाने ही कारवाई केली.