जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर कठोर पावले उचलली आहेत. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू केला आहे. सिंधू पाणी कराराबाबत पाकिस्तानमधील राजकीय तापमान तापलं आहे. दरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी भारताविरुद्ध युद्धाची धमकी दिली आहे. ते म्हणाले की जर मोदी सरकारने सिंधू करार मोडला तर आम्ही नदीत रक्त सांडू. पाकिस्तानला युद्ध नको आहे. पण सक्तीने मागे हटणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी काल (गुरुवारी दि.१ मे) सिंध प्रांतातील मीरपूर खास येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी म्हटलं की जर भारताकडे पहलगाम हल्ल्याचे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत अन्यथा आरोप करणे थांबवावे. आम्ही आमच्या सिंधूला मरू देणार नाही. यापूर्वी भुट्टो यांनी एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अणुहल्ल्याची धमकी दिली होती. बिलावल भुट्टो म्हणाले की पाकिस्तानचे सैन्य नौदल आणि हवाई दल भारताच्या कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.
(संग्रहित दृश्य.)
सिंधू पाणी करारावरील वाद हा दहशतीचे एक प्रमुख कारण.
भारत सरकारने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानची प्रतिक्रिया तीव्र होत आहे. सिंधू नदी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून वाहते जी त्या ठिकाणाची जीवनदायीनी मानली जाते. बिलावल यांनी याला नैतिक अधिकार म्हटले आणि भारतावर अतिक्रमणाचा आरोप केला. भारताने आतापर्यंत सिंधू पाणी कराराचे पूर्णपणे पालन केले आहे. परंतु पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे भारतात त्याला एक धोरणात्मक शस्त्र म्हणून पाहण्याची मागणी वाढली आहे. बिलावल भुट्टो यांच्यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, माजी मंत्री हनीफ अब्बास आणि अनेक जनरल यांनीही अशीच प्रक्षोभक विधाने केली आहेत. यावरून हे स्पष्ट होते की सध्या पाकिस्तानी नेतृत्वात घबराटीचे आणि अस्थिरतेचे वातावरण आहे. यामुळेच पाकिस्तानने लाहोर, कराची, पेशावर सारख्या शहरांमध्ये सायरन सिस्टम बसवली आहे. नियंत्रण रेषेपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या खैबर पख्तूनख्वासारख्या जिल्ह्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सीमावर्ती गावांमध्ये बंकर बांधण्याचे आदेशही देण्यात आले आहे.