TIMES OF AHMEDNAGAR
शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायवाडांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे या गोळीबारात जखमी झाले आहेत. अशात गणपत गायकवाड यांनी मी हा गोळीबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे केला असल्याचं म्हटलं आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यावधी रुपये आहेत.
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि भाजपाबरोबरही ते गद्दारी करणार आहेत. माझ्याबरोबरही गद्दारीच केली. एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत. एकनाथ शिंदे हे देवाला मानत असतील तर त्यांनी सांगावं कि त्यांनी किती पैसे खाल्ले आहेत, किती बाकी आहेत. कोर्ट निर्णय देईल तो मला मान्य असेल. पण महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवली आहे आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे. महाराष्ट्र चांगला ठेवायचा असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे. अशी माझी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. असंही गणपत गायकवाड म्हणाले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
आमच्यासारख्या चांगल्या माणसाला गुन्हेगार बनवलं.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा (महेश गायकवाड) या लोकांनी ताबा घेतला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मला मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मी पाच गोळ्या झाडल्या, मला त्याचा काहीही पश्चात्ताप नाही. माझ्या मुलांना जर मारत असतील पोलीस ठाण्यात तर मग मी काय करणार ? पोलिसांनी मला पकडलं म्हणून तो (महेश गायकवाड) वाचला. पोलिसांनी हस्तक्षेप केला, मी त्याला जीवे मारणार नव्हतो. पण मी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत. एकनाथ शिंदेंचं दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे. असं गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली.