TIMES OF AHMEDNAGAR
लष्कराच्या गणवेशाची हुबेहूब नक्कल करून बनावट गणवेश तयार करून त्याची नाशिक व नगर येथे विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला लष्कराच्या पुण्यातील सदन कमांड येथील मिलिटरी इंटीलीजन्सच्या पथकाने शुक्रवारी (दि.२) भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरातून ताब्यात घेतले. सुरेश खत्री (रा. नाशिक) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ४० बनावट गणवेश व एक कार ताब्यात घेण्यात आली असून, त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, लष्कराच्या या गणवेशाची नक्कल करून बनावट गणवेश खुल्या बाजारात विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील काही नावेही इंटीलीजन्सच्या पथकाला मिळाली आहेत. ते दोघे नवी दिल्ली व राजस्थान येथील असल्याचे सांगण्यात आले. त्यादृष्टीने इंटीलीजन्सच्या पथकाकडून तपास सुरू आहे.


