व्यावसायिक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील संशयित आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी (दि.२६) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.अमोल खोतकर असं संशयित आरोपीचे नाव आहे. वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलने पोलिसांच्या अंगावर गाडी चढवली तेव्हा प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अमोलवर फायरिंग केले त्यातच त्याचा एन्काउंटर झाला. दरम्यान संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा सर्व मुद्देमाल संशयित अमोलकडेच असल्याची माहिती होती. सोमवारी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान ही घटना घडली आहे. १० दिवसांपूर्वी वाळूजमध्ये व्यावसायिक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला होता. त्यावेळी ५ किलो सोनं आणि चांदी चोरीला गेली होती. हा शहरातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा असल्याचे म्हटले जाते. त्याचा तपास पोलिस करत होते. त्यावेळी संशयित अमोल खोतकर याचा शोध घेताना ही चकमक घडली आणि आरोपीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
(संग्रहित दृश्य.)
छातीजवळ गोळी लागली अन्…..
साजापूर वडगाव कोल्हाटी मार्गावर असलेल्या हॉटेल साई गार्डन या हॉटेलचा मालक या दरोडा प्रकरणात संशयित आरोपी आहे. अमोल खोतकर त्याला भेटायला हॉटेलवर येणार असल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली त्यानुसार पोलिसांनी हॉटेलच्या परिसरात साध्या वेशात सापळा रचला होता.अमोल खोतकर मध्यरात्रीनंतर त्याच्या मैत्रिणीसह एका गाडीत हॉटेल जवळ आला आणि हॉटेलच्या मालकाला अमोलने खाली बोलावलं मात्र हॉटेलचा मालक खाली आला नाही तर समोरून पोलीस आले. त्यांनी अमोल खोतकर ला थांबण्याचा इशारा दिला मात्र अमोलने थेट गोळीबार सुरू केला. तसंच पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. यात एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी सुद्धा झाला असून प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला. त्यात अमोलच्या छातीजवळ गोळी लागली गाडी रस्त्यावरून खाली उतरली आणि घटनास्थळीच अमोलचा मृत्यू झाला.