मुंबई : महायुती सरकारमध्ये असलेला अंतर्गत वाद विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकमेकांसोबत न पटणे आता काही प्रमाणात कमी झाले आहे. महायुतीत मागून येऊन सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर जास्त विश्वास असल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी वित्त विभागाची मोठी जबाबदारी अजितदादांकडे दिली. पण एकनाथ शिंदेंना गृहखाते हवे असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी ती मागणी अमान्य केली. ज्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मोठी जबाबदारी दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयामुळे अजित पवारांचे महत्त्व कुठे ना कुठे कमी झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील अंतर्गत वाद टाळण्यासाठी आणि सुरळीत काम होण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्याकडे येणाऱ्या फाइल्स या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठवतील आणि त्यानंतर त्यांची तपासणी एकनाथ शिंदे करतील. एकनाथ शिंदेंनी फाइल पास केल्यानंतर पुढे ती फाइल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठवण्यात येईल. एकंदरितच काय तर अजित पवारांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर एकनाथ शिंदे नजर ठेवून असणार आहेत. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एकीकडे अजित पवारांचे वजन कमी झाले आहे. पण नाराज राहणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महायुतीतील वजन वाढलेले आहे.
(संग्रहित दृश्य.)
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका बदलली….
याआधी महायुतीत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना फाइल प्रथम अजित पवारांकडे देण्यात यायची आणि नंतर ती देवेंद्र फडणवीस यांनी पाहिल्यानंतर ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायची. त्यामुळे आता सुद्धा पुन्हा तीच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका बदलली आहे. कारण आता महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री बनले आहेत. पण अजित पवार ज्या पदी होत त्याच उपमुख्यमंत्री पदावर आहेत. पण आता देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, बुधवारी (दि. २ एप्रिल) बीड दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना पत्रकार परिषदेत याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते या प्रश्नावर उत्तर देताना संतापलेले पाहायला मिळाले. आपल्याला काय त्रास होतो. काही बळ दिले नाही. तुम्ही बळ आणि कळ काढू नका असे त्यांच्याकडून थेट उत्तर देण्यात आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला हा निर्णय अजितदादांच्या सुद्धा पचनी न पडल्याचेच दिसून आले. पण आम्ही तिघेही समाधानी आहोत असे सांगून त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याआधी त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे दादांनी दिलेला हा इशारा नेमका कोणासाठी होता? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.