TIMES OF NAGAR
विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शेखर यादव यांनी केलेलं विधान वादाचा विषय ठरला आहे. या विधानावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत थेट महाभियोगाचा प्रस्ताव संसदेत दाखल केला आहे. या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्याची दखल घेऊन न्यायमूर्ती शेखर यादव यांना नोटीस बजावली आहे. देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कलोजियमची शेखर यादव यांच्याशी बैठक झाली. त्यावेळी कलोजियमनं न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कलोजियमची ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये न्यायमूर्ती शेखर यादव यांनी आपली बाजू मांडली. मात्र, कलोजियमनं न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करताना असं विधान करणं टाळता आलं असतं, अशी भूमिका मांडली आहे. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर काय चर्चा झाली, याबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, कलोजियमनं या विधानावर नाराजी व्यक्त केल्याचं समोर आल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद केलंल आहे.



