घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातात आतापर्यंत ८ जणाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. या घटनेत ६६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अद्याप मदतकार्य जारी असून घटनेच्या ठिकाणी अजून २५ ते ३० जण अडकल्याची माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून कडक कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.