सोलापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. तर बीडमधील सर्वच लोकप्रतिनिधी या घटनेनंतर आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय असल्यानेच पोलिसांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात चालढकलपणा केल्याचा आरोप केला होता. तर,सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील याप्रकरणात आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. विशेष म्हणजे त्यांनी धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना झालेल्या घोटाळ्यांची यादीच आता काढली आहे. आजच अंजली दमानिया यांनी कृषी घोटाळा २ म्हणत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे सरकारवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतच चालला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
(संग्रहित दृश्य.)
मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार हतबल….?
मंत्री भरत गोगावले आज पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनी त्यांना चांगलेच घेरले होते. यावेळी, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसंदर्भात देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपामुळे सरकार अडचणीत येत आहे, सरकार बदनाम होत आहे, असा सवाल पत्रकाराने भरत गोगावले यांना विचारला होता. त्यावर, कुठल्याही गोष्टीला लिमीट आहे, लिमीट पार झालं की ते आपोआप होतं. त्यांचे नेतेमंडळीही काल-परवापासून बोलायला लागले आहेत. मला असं वाटतं की, अजित दादा, शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी एकत्र बसून यासंदर्भात निर्णय होईल, असे गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, एकप्रकारे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर आता सरकार निर्णय घेईल, असेच त्यांनी सूचवलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महत्त्वाचं विधान केलं होतं. माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता. आता, राजीनाम्याचा निर्णय त्यांनी घ्यावा, असे म्हणत राजीनाम्याचा निर्णय धनंजय मुंडेंच्याच कोर्टात ठेवला होता. अजित पवारांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे टोलवाटोलवी करत असल्याचे म्हटले. तसेच, अजित पवारांनी स्वत: त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, असेही दमानिया यांनी स्पष्ट केले होते. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे हतबल झाल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.