माझ्या मुलीवर विश्वास ठेऊ नका,जी बापाची झाली नाही ती तुमची काय होणार ? त्या मंत्र्याने मुलीवर केले भाष्य,अजित पवार म्हणाले अस करू ……
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS NEWS | AJIT PAWAR | DHARMARAO ATRAM | SHARAD PAWAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये जागावाटप, इच्छुक, अशा गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेमेचि येतो पावसाळा या तत्वानुसार निवडणुकांआधी होणाऱ्या पक्षांतरांनाही सुरुवात झाली आहे. त्यात सध्या चर्चेत असलेलं पक्षांतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व सरकारमधील मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री अत्राम यांचा शरद पवार गटात होणारा प्रवेश. मुलीच्या या निर्णयावर धर्मरावबाबा अत्राम यांनी गडचिरोलीत झालेल्या जनसन्मान यात्रेतील सभेमध्ये कठोर शब्दांत टीका केली.
(स्त्रोत.सोशल मिडिया.)
माझा जावई आणि मुलीवर विश्वास ठेवू नका.
धर्मरावबाबा अत्राम यांनी बोलताना मुलगी भाग्यश्री व जावई ऋतुराज हलगेकर यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. त्यांच्याशी संबंध संपल्याचं जाहीर करतानाच अत्राम यांनी दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे, असंही विधान केलंय. वारे येत-जात राहतात. लोक पक्ष सोडून जात असतात. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आमच्या घरचे काही लोक मला वापरून दुसऱ्या पक्षात जाणार आहेत. ४० वर्षं लोकांनी पक्षफोडीचे कार्यक्रम केले. आता घरफोडी करून माझ्या मुलीला माझ्याविरोधात उभं करण्याचा धंदा शरद पवार गटाचे लोक करत आहेत. त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका. माझा जावई आणि मुलीवर विश्वास ठेवू नका असं देखील धर्मरावबाबा अत्राम म्हणाले.
या लोकांनी आपल्याला धोका दिला आहे. त्यांना बाजूच्या प्राणहिता नदीत सगळ्यांनी फेकून दिलं पाहिजे. हे काय चाललंय ? सख्ख्या मुलीला बाजूला घेऊन तिच्या बापाच्या विरोधात उभं करत आहात. जी मुलगी आपल्या बापाची होऊ शकली नाही, ती तुमची कशी होऊ शकेल ? याचा तुम्हाला विचार करावा लागेल. ती काय लोकांना न्याय देणार आहे ? राजकारणात ही माझी मुलगी आहे, भाऊ आहे, बहीण आहे हे मी काही बघणार नाही, अशा शब्दांत धर्मरावबाबा अत्राम यांनी टीका केली. एक मुलगी गेली तरी चालेल, पण दुसरी मुलगी माझ्याबरोबर आहे. माझा मुलगाही माझ्या मागे आहे. माझा एक सख्खा भाऊही माझ्यामागे आहे. माझ्या चुलत भावाचा मुलगाही माझ्या पाठीशी आहे. पूर्ण घर माझ्यामागे एकत्र झालं आहे असं ते म्हणाले.
(स्त्रोत. अजित पवार सोशल मिडिया.)
अजूनही चूक करू नका.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात भाग्यश्री अत्राम यांना वेगळा निर्णय न घेण्याचं आवाहन केलंय. आख्खं कुटुंब धर्मरावबाबांच्या बरोबर आहे. एकाला त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. पण त्या आता धर्मरावबाबांच्याच विरोधात उभ्या राहायला निघाल्या आहेत. आता काय म्हणायचं याला. कुस्त्या खूप चालतात आपल्याकडे. नेहमी वस्ताद त्याच्या हाताखाली जो शिकतो, त्याला सगळे डाव शिकवत नाही. एक डाव राखून ठेवतो. बाकीचे सगळे शिकवतो. मला त्यांना सांगायचंय की अजूनही चूक करू नका. तुमच्या वडिलांबरोबर राहा असं अजित पवार यावेळी म्हणाले.