महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची प्रचाराची आज सांगता होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यातच आता जळगावमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर अज्ञाताकडून आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलीस तपास सुरु आहे. अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या. यामुळे मोठा आवाज झाल्याने शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन खडबडून जागे झाले. त्यांनी याबाबत तपास केला असता काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तीन रिकामी काडतुसे आढळून आली आहे. दरम्यान, शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना अधिकृत मिळाली नसल्यामुळे ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अहमद हुसैन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस गोळीबार करणाऱ्यांचा कसून शोध घेत आहेत. तर अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांना पोलीस संरक्षण मिळणार आहे.