TIMES OF NAGAR
अ.नगर : भारत व पाकिस्तानमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी (दि.१०) सकाळी शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेत देशाच्या तीनही संरक्षण दलांना बळ मिळावे यासाठी साकडे घातले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युध्दाच्या पार्श्वभुमीवर खासदार निलेश लंके यांनी साईबाबांजवळ विशेष प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले. देशासाठी प्राणाची आहुती देणऱ्या शहीद जवानांना त्यांनी यावेळी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की, दोन्ही देशांमधील ही तणावाची परिस्थिती लवकरच सुधारेल. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय पर्यटकांवर गोळया झाडून त्यांचे बळी घेतले. त्याचा बदला भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करून घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कर अथवा तेथील नागरिकांवर हल्ला केलेला नाही. असे असतानाही पाकिस्तानकडून कांगावा करण्यात येत आहे हे दुर्देव आहे. निष्पाप पर्यटकांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना लष्कराने चोख उत्तर देत आपली क्षमता सिध्द केली आहे. अवघ्या २३ मिनिटांमध्ये आपल्या लष्कराने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले हीच भारतीय सैन्य दलाचे वेगळेपण असून त्याचा सर्व भारतीयांना अभिमान असल्याचे सांगतानाच साईबाबांच्या कृपेने देशात शांतता नांदो आणि सर्व भारतीय नागरीक सुरक्षित राहोत अशी सदिच्छा असे खासदार निलेश लंके यांनी यावेळी व्यक्त केले.