राज्यात सध्या निवडणुकांचे वातावरण तापले आहे. अनेक बड्या नेत्यांनी राजकीय पोळी शेकण्याची तयारी केली आहे. त्यातच आता चंद्रशेखर घुले यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यापूर्वी देखील अंतरवाली सराटी येथे जरांगेंची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला घुलेंनी पाठिंबा दिला होता. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा देखील केली होती. दरम्यान आता विधानसभेच्या तोंडावर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी नुकतीच मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यांच्या भेटीचा व्हिडिओ विविध सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

Sample Page – Marutrao Ghule Patil Arts, Commerce & Science College(संग्रहित दृश्य.)

मतदारसंघातील प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी

माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले असून तशी तयारी केली आहे. मागील तीन महिन्यांपासून माजी आमदार नरेंद्र घुले, राजश्री घुले, क्षितिज घुले यांच्यासह स्वतः चंद्रशेखर घुले हे मतदारसंघातील प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.
तसेच मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात छोट्या-मोठ्या मेळाव्याचे आयोजनही घुले कुटुंबाच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु अद्याप त्यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची याबाबत कोणतीच घोषणा केलेली नाही. त्यामुळे पक्ष, झेंडा व चिन्ह जरी माहित नसले तरी देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवायचीच अशी घोषणा त्यांनी विविध कार्यक्रमातून केली आहे. त्यामुळे घुले हे नेमके भाजप, राष्ट्रवादी की इतर कुठल्या पक्षाकडून लढणार, याची चर्चा सुरू असतानाच, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते जरांगे यांच्याकडून उमेदवारी करणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.