कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव मैदानात उतरल्या आहेत. भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. दरम्यान बायको विरोधात उभारल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी संताप व्यक्त केले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना भाजपवर जोरदार टीका केली आहे.
(संग्रहित दृश्य.)
एका राजकीय पक्षाने, माझं घर फोडलं.
हर्षवर्धन जाधव म्हणाले, आमच्या कुटुंबातील एका सदस्याला फोडून एका राजकीय पक्षाने तिकीट दिलं. कुठेतरी या सगळ्या गोंधळाच्या पाठिमागे रावसाहेब दानवे आहेत. माझं घर फोडलं. माझ्या विरोधात साक्षात माझी पत्नी उभी करण्याचं काम झालं, याचा मी जाहीर निषेध करतो. दिवाळी दोन दिवसांवरती आलेली आहे. सर्वजण आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करत आहेत. माझ्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी कोणच उरलं नाही. मी आणि माझी आई दोघेचं उरलेलो आहोत. ठोकून काढू शेवटी धर्मयुद्ध आहे.