सीएम म्हणजे लोकं चीफ मिनिस्टर असं म्हणतात पण माझ्या मते सीएम म्हणजे कॉमनमॅन असा होतो. मी कॉमनमॅन म्हणजेच सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे मला सर्वसामान्य जनतेत जाताना कोणतीही अडचण होत नाही. असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानावरूनच आता आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला आहे. तसेच त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भाजपालाही लक्ष्य केलंय.आदित्य ठाकरे यांनी नुकतीच इंडिया टुडे या वृत्तावाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यादरम्यान त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना महाराष्ट्रात प्रत्येकाला माहिती आहे की ते कॉमनमॅन नाही तर काँट्रक्टर मंत्री आहे. असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
(संग्रहित दृश्य.)
भाजपाचं हिंदुत्व फक्त राजकीय फायद्यासाठी..
एकनाथ शिंदे हे कॉमनमॅन नाही तर काँट्रक्टर मंत्री आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत अशावेळी खंजीर खूपसला ज्यावेळी ते रुग्णालयात होते. कठीण काळात होते. त्यांचे दोन ऑपरेशन झाले होते. त्यावेळी काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिंदे गटाबाबत प्रचंड राग आहे. येत्या निवडणुकीत राज्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपावरही टीकास्र सोडलंय. हिंदुत्त्व ही आमची ओळख आहे. आमचं हिंदुत्वं हे भाजपासारखं खोटं हिंदुत्व नाही. हृदयात राम आणि हाताला काम ही आमच्या हिंदुत्त्वाची व्याख्या आहेत. आमचं हिंदुत्त्व कुणाच्या खाण्यावर किंवा कपडे घालण्यावर बंधणं आणत नाही. पण भाजपाचं हिंदुत्व फक्त राजकीय फायद्यासाठी आहेत. ज्यावेळी बांगलादेशमधील हिंदूवर अत्याचार होतात तेव्हा भाजपा शांत असते. इतकंच नाही तर आयसीसीने स्पर्धा आयोजित केलेली नसताही बांगलादेशबरोबर क्रिकेट मालिका आयोजित केल्या जातात. अशी टीका त्यांनी केली आहे.
(संग्रहित दृश्य.)
स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी मंदिराचं उद्धघाटन केलं.
आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतलं आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते दोन वेळा अयोध्येला जाऊन आले. त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्रीही होते. मात्र आम्ही कधीही त्याचं राजकारण केलं नाही. प्रभू श्री रामांचा वापर आम्ही राजकारणासाठी कधीहीही केला नाही. पण भाजपाने बांधकाम अर्धवट असतानाही केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी मंदिराचं उद्धघाटन केलं आहे. असेही ते म्हणाले.