१७ वर्षीय पत्नीकडून प्रियकराची मदत घेत पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोडलेल्या बियरच्या बाटलीनं ३६ वेळा वार करून आरोपी पत्नीने पतीचा काटा काढला. मध्य प्रदेशाच्या बुऱ्हाणपुरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी प्रियकर पत्नी आणि दोन मित्रांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी मुलीच्या कुटुंबीयांविरुद्ध बालविवाहाचा गुन्हा दाखल करण्याची शक्यताही पोलीस तपासत आहेत. इंदूर ते इच्छापूर महामार्गावरील बुऱ्हाणपुरमधील आयटीआय कॉलेजजवळील झुडपात (दि.१३) एप्रिल रोजी एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर राहुल कुमार उर्फ राजेंद्र पांडे याचा मृतदेह असल्याचे समोर आले. मृतदेह सापडण्याच्या एक दिवसआधी राहुल कुमार त्याच्या पत्नीसोबत खरेदीसाठी गेला होता. तसेच यानंतर आरोपी पत्नी देखील बेपत्ता होती. त्यामुळे पोलिसांनी या अँगलने तपास सुरु केला.