मनोज जरांगे पाटील हे नाव गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन, त्यानंतर उपोषण, सरकारशी अनेक फेऱ्यांमध्ये केलेली चर्चा, निवडणूक लढवण्याची घोषणा आणि शेवटी माघार अशा अनेक गोष्टींमुळे मनोज जरांगे पाटील कायम चर्चेत राहिले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून त्यांनी ऐन वेळी घेतलेली माघार राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांसाठी कारणीभूत ठरली आहे. तरी जरांगे पाटील वेगवेगळ्या भागात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. लासलगावमध्ये अशाच एका संवादादरम्यान त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे.
(संग्रहित दृश्य.)
माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये.
मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री त्यांनी अचानक माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे उमेदवारांची पंचाईत झाली आहे. त्यांनी अर्ज माघारीही घेतले. पण यामुळे जरांगे पाटील यांची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. निवडणुकीत कुणाला पाडायचं, कुणाला जिंकवायचं यासंदर्भात त्यांनी केलेली विधानंही चर्चेत आल्यानंतर आता त्यांनी मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा, हे केलेलं विधान मराठा समाजासाठी चिंतेचा विषय ठरलं आहे. लासलगावमध्ये मराठा समाजातील लोकांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीसंदर्भातील त्यांच्या भूमिकेबाबत भाष्य केलं आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत केलेलं विधान कार्यकर्त्यांची चिंता वाढवणारं ठरलं आहे. मी तुमचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये, माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये, अशी माझी इच्छा आहे. असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. मला दर ८-१५ दिवसांनी सलाईन लावावी लागते. मी तुम्हाला आधीपासूनच सांगतोय. कारण हे शरीर आहे. कधी जाईल माहिती नाही. मी तुमच्यात किती दिवस राहीन हे मलाही सांगता येत नाही. माझं शरीर कधी धोका देईल सांगता येत नाही. मी उपोषणं केली आहेत. त्या उपोषणांमुळे मला चालताना, उतरताना-चढतानाही त्रास होतो, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत तर्क-वितर्क केले जाऊ लागले आहेत.