नाशिक:भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केले तर एक वेगळा पक्ष उभा राहील, असे वक्तव्य राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या आहे. यामध्ये कोणतेही दुमत नाही, ही गोष्ट अगदी खरी असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्या रविवारी नाशिकमध्ये वारकरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य वडिलांच्या आठवणीमुळे केले की त्यांनी या माध्यमातून भाजपला सूचक इशारा दिला आहे, यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण झाले आहे.
मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर एक वेगळा पक्ष वेगळा उभा राहील. एवढी ताकद मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये आहे आणि त्यांची तितकी मोठी संख्या आहे. हे अगदी खरं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्यावर प्रेम करणारे, हे सर्व लोक केवळ गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून माझ्याशी जोडले गेलेले नाहीत. लोक गुणांचा वारसा स्वीकारतात, गुणांवर प्रेम करतात. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभा आहे. भाजपच्या जन्मापासून गोपीनाथ मुंडे यांनी काम करुन राज्यात हा पक्ष उभा केला आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
(संग्रहित दृश्य.)
राजीनाम्याचा निर्णय फडणवीस आणि अजित पवार घेतील.
पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत सुरु असलेल्या चर्चेबाबत भाष्य केले. बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाचा मी निषेध केला आहे. राज्य सरकार हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळत आहे.मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील, असे ही पंकजा मुंडे यांनी म्हटले. पंकजा मुंडे रविवारी नाशिकच्या स्वामी समर्थ केंद्रातील कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी श्रद्धा-अंधश्रद्धा या विषयावर भाष्य केले. स्वामींच्या कृपेने मला पर्यावरण खातं मिळालंय. पण मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही. माझ्या बाबांचा गणपती दूध पीत नव्हता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.