विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरच्या दिवसाकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यभरात विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचंही पाहायला मिळत आहे.
(संग्रहित दृश्य.)
पुन्हा एकदा मशिदीवरचे भोंगेंच्या विषयावरून…
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील वरळी मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरचे भोंगेंच्या विषयावरून मोठं भाष्य केलं आहे. सत्ता हातात द्या, पहिल्या ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो. असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री झाले हे सर्वांना माहिती आहे. सध्याच्या काळात काहीही विचारधारा उरलेली नाही. २०१९ नंतर कोणाचं सरकार येणार ? हेच आपण पाहत बसलो होतो. एकेदिवशी सकाळी ६ वाजता कळलं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत आहेत. आधी तर विश्वास बसला नाही. आर्धा तास ते लग्न टिकलं. आर्ध्या तासात घटस्फोट झाला. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले. मग यांना काही जणाची नाही आणि मनाची नाही. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्या बरोबर सत्तेत जाऊन बसले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक बॅनर्सवरील नावापुढंचं हिंदूहृदयसम्राट हे नाव काढलं. हे का काढलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाईट वाटेल आणि त्यांना ते परवडणारं नाही. तसेच काही उर्दू बॅनर्सवर जनाब बाळासाहेब ठाकरे नाव टाकलं. आज ते हयात असायला हवे होते. त्यांनी एकएकाला फोडून काढलं असतं. असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.