कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्या दाढी, चष्म्यावरुन आणि शिवसेना पक्षातील बंडावरुन एका गाण्याचे विडंबनात्मक गाणे गायले. कुणाल कामराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. काही शिवसैनिकांनी कुणाल कामराने जिथं हे गाणं गायलं, त्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच, कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामराचं गाणं म्हटल्याचा व्हिडिओ समोर आला. याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात देखील उमटले. यानंतर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधानपरिषदेचे सदस्य आमदार प्रविण दरेकर यांनी बुधवारी (दि.२६) विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधातील हक्कभंग स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सुषमा अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक आणि उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडं योग्य त्या कारवाईसाठी पाठवित असल्याचे जाहीर केले होते.
(संग्रहित दृश्य.)
कुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला…
आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधातील हक्कभंग स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सभापती राम शिंदे यांच्या सहीनंतर हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्यात आला आहे. हक्कभंग समितीकडून कदाचित आजच सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना खुलासा करण्याबाबत नोटीस पाठवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा नेमका काय खुलासा करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.