सांगली : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून पतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिराळा तालुक्यातील मांगले या गावात घडला आहे. या प्रकारानंतर पतीने भावाच्या सांगण्यावरून समक्ष पोलीस ठाण्यात हजर होउन खूनाची कबुली देखील दिली आहे. सहा वर्षाच्या मुलाने ही हकीकत चुलत्याला सांगताच हा प्रकार समोर आला आहे. मांगले वारणानगर रस्त्यावर भाड्याच्या घरात गेल्या १५ वर्षापासून वास्तव्य असलेल्या मंगेश चंद्रकांत कांबळे (वय ३२ रा. मांगले, मूळ राहणार कोकरूड) याने पत्नी प्राजक्ता (वय २७) हिचावर चारित्र्यांचा संशय घेउन ओढणीने गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह शेजारच्या खोलीत असलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत ठेवून त्यावर पांघरूण घातले. संशयित पती मुंबईमध्ये नोकरीस असून काही दिवसापुर्वीच आईकडे आला होता. मांगले येथे त्याची आई व भाऊ राहतात. काल आई परगावी गेली होती. या दरम्यान मंगेश कांबळे आणि पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. या दरम्यान त्यांचा सहा वर्षाचा मुलगा शिवम व तीन वर्षाची मुलगी शिवन्या होती. भांडणात पतीने पत्नीचा गळा ओढणीने आवळून खून करून प्रेत पत्र्याच्या पेटीत ठेवले. आणि भावाला फोनवर मी कामासाठी बाहेर जात असल्याचे सांगितले. घटनेनंतर काही वेळाने भाऊ घरी आला असता सहा वर्षाच्या शिवमने मम्मीचे आणि पप्पाचे भांडण होउन मम्मीला खलास केले असल्याचे सांगितले. भावाने फोन केला असता पत्नी रूसून गेल्याचे सांगून तिच्या शोधात आपण जात असल्याचे संशयितांने सांगितले. शिराळ्यातील गोरक्षनाथ मंदिराजवळ भावाने त्याला थांबण्यास सांगून भाऊ तात्काळ त्याठिकाणी जाउन या प्रकरणाचा आपणास त्रास व्हायला नको तू तात्काळ पोलीस ठाण्यात जाउन कबुली दे असे भावाने सांगताच संशयितांने पोलीस ठाण्यात हजर होउन खूनाची कबुली देत मृतदेह पेटीत लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलीसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.