गुरुवारी रात्री पाकिस्तान सैन्याने भारताच्या सीमारेषेवरील १५ ठिकाणी तिहेरी हवाई हल्ला केला. ड्रोन्स रॉकेट लाँचर्स आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला होता. मात्र भारताच्या अत्याधुनिक एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीमसह एल-७० गन, झेडयु -२३ मिमी अँटी एअरक्राफ्ट गन्स आणि शिल्का प्रणालीने पाकिस्तानचा हा हल्ला अपयशी ठरवला. या घडामोडींच्या दरम्यान भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या युद्धनौकांनी कराची बंदरावर जोरदार कारवाई केली. याचवेळी भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर रात्रभर ड्रोन हल्ले करत शत्रूला चांगलाच धक्का दिला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या साकिनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ येथून यासंदर्भात फोन आला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. प्राथमिक माहितीनुसार हजरत तय्यद जलाल मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसून आला होता. काही क्षणांतच तो ड्रोन साकिनाका झोपडपट्टी परिसराच्या दिशेने गेला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साकिनाका पोलीस ठाण्याने तत्काळ कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. पोलीस विविध पथकांसह परिसरात तपास करण्यात आला. या प्रकरणी साकीनाका पोलीस आणि सीआयएसएफ यांनी हरी मस्जिद परिसर जरीमरी येथे पहाटे पाच वाजताच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन केले आहे. मात्र यात असे ड्रोन वैगरे काहीही आढळून आले नाही. तरी नागरिकांनी पॅनिक होऊ नये असे आवाहन साकीनाका पोलिसांनी केले आहे.
(संग्रहित दृश्य.)
पाकिस्तानकडून नागरी भागांवर हल्ल्याचा प्रयत्न; दिल्लीत हालचालींना वेग
दरम्यान काल रात्रीपासून पाकिस्तानी सैन्य भारताच्या नागरी वस्त्यांवर सतत हल्ले चढवत आहे. या हल्ल्यांसाठी रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. मात्र, भारतीय सैन्याने या हवाई हल्ल्यांचा प्रभावीपणे प्रतिकार केला आहे. विशेषतः एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम, एल-७० गन्स, झेड्यू -२३ mm अँटी एअरक्राफ्ट मशीनगन्स आणि शिल्का प्रणालीने या प्रतिकारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर भारत पाकिस्तानविरोधात सर्वात मोठा आणि निर्णायक कारवाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतले जातात, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.