मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण केलं. मात्र, अद्याप राज्य सरकारने त्यांच्या मागणीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यातच आता श्री क्षेत्र नारायण गड बीड येथे मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या दसऱ्या मेळाव्याला लाखो मराठा बांधव नारायण गडावर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा हा मेळावा महत्वाचा मानला जात होता. यातच काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत सूचक विधान केलं. यानंतर आता दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे यांनी राजकीय भूमिकेबाबत मोठे संकेत दिले आहेत.आचारसंहिता लागेपर्यंत थांबा, आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
(संग्रहित दृश्य.)
तुमची शान मी वाढवल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्या सर्वांच्या मनात जे आहे तेच मी करणार आहे. मी एवढंच सांगतो. आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे. मात्र आचारसंहिता लागेपर्यंत आपल्याला धीर धरायचा आहे. सरकारला सांगतो तुम्हाला सुट्टी नाही. पण आचारसंहिता लागल्यावर तुम्ही सर्वांनी माझं ऐकायचं. ते काय करतात हे सगळं आपण पाहायचं. त्यानंतर त्यांनी सगळं करेपर्यंत आपण कोणताही निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सगळं केल्यावर आपण निर्णय घ्यायचा. तुमच्या मनात जे आहे, तेच पूर्ण करायची जबाबदारी माझी. तुमची शान मी वाढवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत जरांगे यांनी एक प्रकारे आपल्या राजकीय भूमिकेबाबत मोठे संकेत दिले आहेत.
(संग्रहित दृश्य.)
आपल्याला या समाजाच्या लेकरांसाठी लढावेच लागणार आहे.
महाराष्ट्रात एक लाट आली आणि उठाव झाला. मात्र आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार आहे. या शिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सरकार जर आपल्या नाकावर टिचून कुठले निर्णय घेत असेल आणि राज्यातील मराठा समाजावर अन्याय होणार असेल तर आपल्याला या समाजाच्या लेकरांसाठी लढावेच लागणार आहे. शेवटी आपल्याला आपला समुदाय आणि शेतकरी महत्वाचा आहे. मला तुमच्याकडून एकच वचन पाहिजे. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि मी सांगितलं आपल्याल हेच करायचं तर तेच करा, हे वजन मला आज तुम्ही द्या, असं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.