जे लोक हिंदू खतरे में म्हणतात, त्यांना मराठ्यांची आरक्षण लढ्यातील एकजूट दिसत नाही का? असा सवाल करत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी भाजपप्रणित महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा जातीमध्ये मतदानाबाबत कोणताही संभ्रम नसून लोकसभेत सांगितले तेच विधानसभेत करायचे आहे, असे सूचक वक्तव्यही जरांगे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. निवडणुकीमध्ये मराठा समाज महायुती सरकारला त्यांचा राग दाखवून देईल. मुस्लीम विरोध करताना मराठा समाजाच्या हातात लाठ्या देऊन त्यांचा वापर करून घेतला जातो. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, ही दोन्ही घोषवाक्ये कोणासाठी आहे. मराठा ही हिंदूमधील मोठी जात आहे. तेव्हा आम्ही आमचे बघून घेऊ. आम्ही शिवछत्रपतींचे हिंदूत्व मानतो, असे जरांगे म्हणाले. मराठा समाजाला माहीत आहे कोणाला पाडायचे आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम नाही, असेही ते म्हणाले. जे आरक्षण विरोधी आहेत त्यांना ते शंभर टक्के पाडतील. मोदींच्या विकासाच्या दाव्यावर मनोज जरांगे यांनी तिरकस टीका केली आहे. मुस्लीम, दलित व्यापाऱ्यांच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी राग आहे. तो मतदानातून व्यक्त होईल, असे ते म्हणाले.