अ.नगर : नालेगाव येथे लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्थेत स्वस्त दरात प्लॉट मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी (१२ जून) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कैलास नामपेल्ली उषाकोयल (वय ६१, रा. झारेकर गली, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली असून, प्रकाश भुमय्या कोटा (रा. बालाजी सोसायटी, अहिल्यानगर- कल्याण रस्ता, अहिल्यानगर) व अशोक बाळु पुंड (रा. साई गजानन कॉलनी, लेखानगर, सावेडी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अशोक पुंड हा जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे. त्यानेच गंडा घातल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. फिर्यादी कैलास उषाकोयल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांची प्रकाश कोटा व अशोक पुंड यांच्यासोबत पूर्वीपासून ओळख असून, मैत्रीच्या नात्याचा गैरफायदा घेत २०११ साली दोघांनी लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापनेचे आमिष दाखवले.गरिबांसाठी ५०० चौ.फुटांचे प्लॉट कमी किमतीत देण्याचे आश्वासन दिले आणि शासकीय प्रक्रियेअंती प्लॉट मिळतील, असे सांगत विश्वास संपादन केला. कैलास नामपेल्ली उषाकोयल कुटुंबीयांनी ७५ हजार रूपये प्रमाणे कैलास, पत्नी रत्नमाला, मोठा मुलगा सचिन व लहान मुलगा आकाश यांनी एकूण ३ लाख रूपये कोटा व पुंड यांना चेक व पावत्यां करून दिले. याशिवाय त्यांच्या ओळखीचे लक्ष्मण श्रीगादी यांनी आपल्या चार मुलांच्या नावाने ३ लाख रूपये, तर उषाकोयल यांची बहीण शशीकला मिठापेल्ली हिने १ लाख २५ हजार रूपये रोख स्वरूपात दिले होते.
(संग्रहित दृश्य.)
पोलिसानेच लाखोंना फसवले ?
रक्कम घेऊन बराच काळ उलटला तरी प्रकाश कोटा व अशोक पुंड यांनी प्लॉटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा केली असता जिल्हाधिकारी परवानगी प्रक्रियेत आहे, प्लॅन मंजूर होतोय अशी कारणे देत वेळ मारून नेण्यात आली. शेवटी सरकारी कार्यालयात चौकशी केली असता कोणतीही फाईल किंवा प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा ही संपूर्ण बाब फसवणुकीची असल्याचे उघड झाले. उषाकोयल यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाची कोतवाली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेला अशोक पुंड हा जिल्हा पोलीस दलात नोकरीला आहे. सध्या त्याची नियुक्ती येथील आर्थिक गुन्हे शाखेत आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांचा अंगरक्षक म्हणून तो ड्यूटी करत आहे. गोरगरिब लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई झाली नव्हती. मात्र आता त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ अधिकार्यांकडून त्याच्यावर काय कारवाई होते याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यासंदर्भात उपअधीक्षक गणेश उगले यांच्याशी संपर्क साधला असता अशोक पुंड चार दिवसांपासून सुट्टीवर असल्याचे त्यांनी सांगितले. पुंड याने लोकांची फसवणुक केली व त्याच्यावर गुन्हा दाखल झाला याबाबत माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. उषाकोयल कुटुंबाचे ३ लाख, श्रीगादी कुटुंबाचे ३ लाख तर मिठापेल्ली यांचे १ लाख २५ हजार असे या प्रकारात एकूण ७ लाख २५ हजार रूपयांची रक्कम घेऊन कोणताही कायदेशीर दस्तऐवज किंवा प्लॉटचा ताबा न देता कोटा व पुंड यांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.