TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या शहर विधानसभा मतदार संघाच्या समन्वयक पदी दत्ता जाधव यांची वर्णी लागली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख आमदार सुनिल शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या सहीने हे पत्र दत्ता जाधव यांना शिवालय येथे देण्यात आले.

राठोडांच्या तालमीतले जाधव आज शहर विधानसभा मतदार संघाच्या समन्वयक पदी
दत्ता जाधव हे राजकारणात जरी सक्रीय असले तरीही त्यांचे सामाजिक कार्यातले योगदान महत्वाचे आहे. सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उभा राहणारा सेवक म्हणून जाधव यांची शहराला ओळख आहे. जाधव हे माजी.आमदार स्व.अनिल राठोड यांच्या राजकीय तालमीत घडलेले शिवसैनिक आहेत. दत्ता जाधव यांची शहर विधानसभा मतदार संघाच्या समन्वयक पदी निवड झाली यावेळी दत्ता जाधव बोलत होते. शिवसेना उपनेते तथा माजी.आमदार स्व.अनिल राठोड यांनी नगर शहरात शिवसेना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविली आहे. त्यांचा आदर्श घेऊन नगरमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते काम करत आहेत. विधानसभेत पुन्हा शिवसेनेचा आमदार करण्यासाठी पक्षाची मोर्चेबांधणी सुरु असून, त्याचाच एक भाग म्हणून आपली समन्वयक पदी निवड केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन शिवसेनेशी जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा आपण प्रयत्न करु असे जाधव यांनी म्हटले आहे.


