पुणे : वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिचं नऊ महिन्यांचं लेकरु नेमकं कोणाकडे आहे ? असा सवाल आता उपस्थित झाला आहे, त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना भेटत नाहीये. पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या बंदूकधारी निलेश चव्हाणकडे हे बाळ आहे, अशी माहिती काल (बुधवार दि.२१) समोर आली होती. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही, त्यामुळं तुम्ही इथून चालते व्हा, असा दम त्याने भरला होता. विशेष म्हणजे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणेंचे मोठे भाऊ जयप्रकाश हगवणे हे कस्पटे कुटुंबियांसोबत असताना ही निलेश चव्हाणने बाळाचा ताबा देण्यास नकार दिला. हा निलेश वैष्णवीचे पती शशांक हगवणेचा मित्र असण्याची शक्यता कस्पटे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. आज (गुरूवार दि.२२) वैष्णवीच्या माहेरचे त्या बाळाला आणायला गेल्यानंतर ते बाळ तिथं नसल्याची माहिती समोर आली.
(संग्रहित दृश्य.)
बातम्या आल्या त्यामुळे तो फरार झाला…..
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, माझा भाऊ मोहन, माझा मुलगा विराज आणि माझे दाजी उत्तम बहिरट हे तिघेजण बाळाला आणायला गेले होते, आता मला तिथून फोन आला होता. तिथं बाळ दिसत नाही. ते पिरंगुटच्या इकडे असण्याची शक्यता असल्याची माहिती माझ्या भावाने दिली आहे. काल बाळ आणायला गेल्यावर (बुधवारी) त्याने आम्हाला बंदूक दाखवली होती, त्यानंतर बातम्या आल्या. त्यामुळे तो फरार झाला, जर आम्हाला बाळ नाही मिळाला तर आम्ही कोर्टात जाणार आहे अशी माहिती वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी दिली आहे.
बाळाला वैष्णवीच्या माहेरच्यांना सोपवणार …..
बाळाला वैष्णवीच्या माहेरच्यांना सोपवण्याबाबत आज महिला आयोगाने माहिती दिली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा ताबा आज वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात येईल. हगवणे कुटुंबातील ३ आरोपी अटक आणि २ फरार असताना वैष्णवी यांचे १० महिन्यांचे बाळ राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे होते. आज कायदेशीर मार्गाने जात सर्व प्रक्रिया पूर्ण करून या बाळाचा ताबा वैष्णवी यांच्या आई वडिलांकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आयोगाने दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांना बाळ कस्पटेंकडे सोपवण्याच्या सूचना केल्या आहेत. वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील यांना कस्पटेंच्या घरी जाऊन बाळ सोडवायला सांगितल आहे.
(संग्रहित दृश्य.)
त्या बाळाला काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार ?
राजेंद्र हगवणे यांच्या भावाने माहिती दिल्यानंतर कस्पटे त्या बाळाला घेण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेले मात्र, त्याने बाळाला न देता कस्पटेंना हुसकावून दिलं. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांकचा मित्र असल्याची माहिती आहे. कस्पटे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली, त्यावेळी पोलिसांनी कस्पटेंना कोर्टात जाण्याबाबतचा सल्ला दिला. वेष्णवीचे काका मोहन कस्पटे निलेश चव्हाणच्या घरी पोहोचले, तेव्हा दार बंद असल्याचं दिसून आलं आहे. निलेश चव्हाणच्या घरी काल (बुधवारी) गेल्यानंतर त्याच्या घरी तो, त्याचे आईवडील, एक महिला आणि बाळ होतं. आज (गुरूवारी) कस्पटे पुन्हा एकदा बाळाला घेण्यासाठी गेले तेव्हा दार आतून बंद होते. कदाचित बाळ असू शकतो किंवा नसू शकतं, अशी शक्यता कस्पटेंनी वर्तवली आहे. ते बाळ हगवणे यांच्याकडे असतं तर कोर्टाकडून घेण्यात आलं असतं, मात्र बाळ तिसऱ्या व्यक्तीकडे आहे, त्या बाळाला काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा प्रश्न कस्पटेंनी उपस्थित केला आहे. कायदा देखील हे वैष्णवीचं बाळ एकतर कस्पटे किंवा हगवणे कुटूंबाकडे असायला हवं असं सांगतो. आता हगवणे कुटूंबातील सदस्य अटक आहेत किंवा फरार आहेत. त्यामुळे आता एका तिसऱ्याच कुटूंबाकडे बाळाचा ताबा असल्याने वैष्णवीचे काका मोहन कस्पटे आले होते. त्या ठिकाणी कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते पुन्हा आज एकदा पोलिसांकडे जाणार आहेत. बाळ निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती राजेंद्र हगवणेंच्या भावाने दिली होती. बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कस्पटे कुटूंबाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. आई कायमची सोडून गेली त्यानंतर आता त्या नऊ महिन्याच्या बाळाची परवड होत असल्याचं दिसून येत आहे.