पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील प्रचार दौऱ्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने महायुतीची पुन्हा सत्ता आल्यास नेतृत्व फडणवीस यांच्याकडे सोपविण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ विमानतळ उभारण्याची फडणवीस यांची इच्छा महायुती सरकार सत्तेवर आल्यावर मी पूर्ण करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथील प्रचारसभेत सांगितले होते. फडणवीस यांची इच्छा, असा उल्लेख पंतप्रधानांनी केल्याने राजकीय वर्तुळात त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विजयी करण्याचे राज्यातील जनतेने ठरविले आहे. अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस यांचे कौतुक केल्याने त्यालाही वेगळा पदर आहे. मी दीड महिन्यांपूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी महाराष्ट्रातील सर्व भागांचा दौरा केला. तेव्हा महायुतीचे सरकार आणायचे आणि देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे, त्यांनी ठरविले आहे. असे मला जाणवल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.