अहिल्यानगर शहरात कॅफेंच्या माध्यमातून तरुण-तरुणींना अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून वाढत आहेत. विद्यार्थी तसेच शहरातील तरुण या कॅफेंमध्ये अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होताच याची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही मोहीम स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार (दि.२९) एप्रिल शहरातील आणि भिंगार परिसरातील पाच कॅफेंवर धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कॅफे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तिथे आढळलेल्या तरुण-तरुणींना समज देऊन सोडण्यात आले आहे.
(संग्रहित दृश्य.)
अश्लील कृत्यांसाठी जागा…
मंगळवार (दि.२९) एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पाच कॅफेंवर छापे टाकले. यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर-कल्याण रोडवरील ‘द परफेक्ट कॅफे’ आणि सारसनगर ते वाकोडी रोडवरील ‘बेलाचाव कॅफे’, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावेडी येथील पंपिंग स्टेशनजवळील ‘ऑरिगेनो कॅफे’ आणि कोहिनूर मॉलजवळील ‘झेडके कॅफे’, तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँक चौकातील ‘वननेस कॅफे’ यांचा समावेश होता. तपासणीदरम्यान, या कॅफेंमध्ये तरुण-तरुणी अश्लील कृत्यांमध्ये गुंतलेले आढळले. कॅफे चालकांना परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कॅफे चालवण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे समोर आले. या कॅफेंनी कॉफी शॉपचा बोर्ड लावला असला, तरी तिथे कॉफी, पेय किंवा खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले नव्हते. उलट, तरुण-तरुणींना बसण्यासाठी आणि अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे उघड झाले.
(संग्रहित दृश्य.)
या लोकांवर कारवाई
या कारवाईत पथकाने नऊ कॅफे चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. यामध्ये महेश पोपट खराडे (वय २३, रा. नालेगाव, अहिल्यानगर, परफेक्ट कॅफे),आसिफ आयाज शेख (वय २६, रा. भोसले आखाडा, बुरुडगाव, अहिल्यानगर, बेलाचाव कॅफे), विशाल विष्णू वाघ (वय १८, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर, बेलाचाव कॅफे), मंगेश भरत आजबे (वय १९, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर, बेलाचाव कॅफे), महेश शंकर दरंदले (रा. चिपाडेमळा, अहिल्यानगर, फरार, बेलाचाव कॅफे), अविनाश विलास ताठे (वय ३२, रा. ताठेनगर, सावेडी, अहिल्यानगर, ऑरिगेनो कॅफे), मंगेश रमेश देठे (वय १९, रा. भगवती कोल्हार, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, झेडके कॅफे), महेश सातपुते (रा. अहिल्यानगर, फरार, झेडके कॅफे), कृष्णा अनिल कराळे (वय १९, रा. तपोवन रोड, ज्ञानसंपदा शाळेमागे, अहिल्यानगर, वननेस कॅफे) यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९ आणि १३१ (क) अंतर्गत कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले. कॅफेंमध्ये आढळलेल्या तरुण-तरुणींना समज देऊन त्यांना सोडण्यात आले. या गुन्ह्यांचा पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.तर या पथकात पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह पोलीस कर्मचारी संदीप पवार, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, जालिंदर माने, मयूर गायकवाड, भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर आणि ज्योती शिंदे यांचा समावेश होता.