पत्नी नांदावयास येत नसल्याच्या नैराश्यातून व्यसनाधीन पतीने आपल्या तिसरीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय मतिमंद मुलाचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.२९) नाशिक रोड परिसरात घडली. विशेष म्हणजे खून केल्यानंतर नराधम बापाने मुलाला गोणीत टाकून पत्नीच्या बहिणीच्या घरी आणून ठेवत पळ काढला. गणेश सुमित पुजारी असे मृत मुलाचे नाव असून पोलिसांनी नराधम बाप सुमित पुजारी याला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित भारत पुजारी व त्याची पत्नी सारिका सुमित पुजारी हे आपल्या प्राची, सिद्धार्थ व गणेश या तीन मुलांसोबत जेलरोड मंगलमूर्ती नगर येथे राहतात. गेल्या दीड महिन्यांपासून पत्नी सारिका निघून गेल्यामुळे सुमित पुजारी हा व्यसनाधीन झाला होता. दारूच्या नशेत त्याने मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास तिसरीमध्ये शिकत असलेल्या आपल्या मतिमंद मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने मृतदेह गोणीमध्ये भरला आणि ती गोणी घेऊन पत्नीच्या बहिणीच्या घरी कॅनॉल रोड, इंदिरानगर, जेलरोड येथे आला. त्यावेळी त्याचा मेहुणा घरी असल्याचे पाहून त्याला पैसे दिले व मला दारूची बाटली घेऊन ये असे सांगितले. मेहुणा दारूची बाटली आणण्यास गेला असता सुमित पुजारीने गोणीत बांधलेल्या आपल्या मुलाचा मृतदेह घरातील पलंगावर ठेवून पळ काढला. त्यानंतर सुमितने मेहुणीला कॉल करून माझा लहान मुलाला मी मारून टाकले व तुझ्या घरात ठेवले आहे असे सांगितले. मतिमंद नातू गणेश हा तीन तासांपासून दिसत नसल्याने आजोबा भारत पुजारी यांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान सुमितने त्याला त्याच्या मावशीच्या घरी सोडले असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तेथे जाऊन खात्री केले असता गणेश हा गोणीत निचपित पडलेला होता. त्याला तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले असता बिटको रुग्णालयातील डॉ. ओसवाल यांनी त्यास मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन नराधम सुमित पुजारी या बापास ताब्यात घेतले असून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.