TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI POLICE | GANAPATI UTSAV 2024 | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मुंबई-पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रात आज लाडक्या बाप्पांचं आगमन होत आहे. बाजारपेठांमधून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. घरगुती बापांसह शेकडो मंडळांमध्येही गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व गणेशभक्तांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन पोलीस वर्ग रस्त्यावर खडा पाहारा देत आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता मुंबईत पोलीस आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.
यानुसार त्यांना पोलीस गणवेशात गणेश मिरवणुकीत किंवा इतर ठिकाणी नृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था व पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुंबईत पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान गणवेशावर नाचू नये, अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्तांनी दिली आहे. यासंदर्भात एएनआयनं एक्सवर माहिती दिली आहे.
‘किसी दिन मुस्कुरा कर ये नजारा हम भी देखेंगे’
६ सप्टेंबर रोजी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये पोलिसांना गणेशोत्सवादरम्यान गणवेशात नृत्य करण्यास मनाई केली आहे. तसेच असे करताना कोणता पोलीस अधिकारी व कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी त्यांच्या गणवेशाचा आदर राखला पाहिजे असं विवेक फणसाळकर या बैठकीत म्हणाल्याचं वृत्त मुंबई पोलिसांच्या हवाल्याने एएनआयनं दिलं आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये काही पोलिसांचे गणवेशात नाचतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. मुघल-ए-आझम चित्रपटातील ‘किसी दिन मुस्कुरा कर ये नजारा हम भी देखेंगे’ या गाण्यावर सदर महिला अधिकारी नाचताना दिसत आहे. यावर अनेक युजर्सनं टीकात्मक पोस्टही केल्या होत्या.