अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम करणाऱ्याने विद्यार्थिनींचे वर्ग मित्रासोबत बसलेले फोटो विभागप्रमुखांना दाखवून शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अमित खराडे असे आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या अमित खराडे याने कॉलेजमधील काही विद्यार्थिनींचे वर्गमित्रासोबत बसलेले फोटो विभाग प्रमुखांना दाखवून शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी दिली. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. कॉलेजच्या गोडाऊनमध्ये घेऊन जात संबंधित विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न होईल अस वर्तन आरोपीने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे या आरोपीने दोन विद्यार्थिनींसोबत हा प्रकार केल्याचे समोर आले असून अल्पवयीन विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमित खराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित दोन विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी आपल्या मैत्रिणीला हा प्रकार सांगितला आणि या विद्यार्थिनीने धाडस करत ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना सर्व हकीकत सांगितल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.